
गडचिरोली टाइम्स दि.२५जुलै:गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. धानोरा नगरपंचायतीचे काँग्रेसचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच ११ नगरसेवकांनी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केलेले बहुतांश पदाधिकारी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे या सामूहिक पक्षप्रवेशामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
धानोरा तालुक्यात ललित बरछा यांची ओळख जमिनीशी नाळ जोडून काम करणारे, आक्रमक भूमिका घेणारे आणि काँग्रेसची संघटना मजबूत करणारे नेते अशी होती. यापूर्वी धानोऱ्यातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळी ललित बरछा यांनी भाजपवर कठोर टीका करत पक्षांतराला उघड विरोध केला होता. मात्र आता त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसच्या अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या पक्षप्रवेशामुळे धानोरा नगरपंचायतीतील काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. धानोरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या घडामोडीचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
गडचिरोली विधानसभा निवडणुकीत धानोरा आणि गडचिरोली या दोन तालुक्यांत काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली होती. मात्र अहेरी, एटापल्ली आणि मुलचेरा तालुक्यांत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आघाडीमुळे भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे हे आमदार म्हणून निवडून आले होते. आता धानोरा तालुक्यातही भाजपची ताकद वाढल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
धानोरा तालुक्यात काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेससमोर नव्याने संघटन उभारणीचे आव्हान निर्माण होणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
या घडामोडीनंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे की, धानोरा तालुक्यातील काँग्रेसचा मजबूत गड आता खरोखरच ढासळण्यास सुरुवात झाली आहे का? तसेच भाजपने धानोरा तालुक्यात निर्णायक राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे का? याचे उत्तर आगामी काळातील राजकीय घडामोडींमधून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या सामूहिक पक्षप्रवेशाबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तर भाजपकडून हा प्रवेश पक्षाच्या वाढत्या जनाधाराचा आणि विकासाच्या राजकारणावरील विश्वासाचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशाचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये कितपत उमटतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


