गडचिरोली टाइम्स दि. २५जुलै:जगात सचोटी.. परस्परावरील विश्वास.. श्रद्धा याचा लोप होत असताना आज पंढरीत पापभीरू सश्रद्ध भक्तांची भगव्या पताका फडकवणारी प्रचंड निशस्त्र सेना जमलीय. या गर्दीची कुणाला भीती नाही. सुखोपभोग सारत वायूवेगाने धावणाऱ्या जगात निसर्गाशी मैत्री करत शेकडो कि.मी. पायी चालणाऱ्यांच्या श्रद्धा.. निष्ठा.. अपार कष्टाचे कौतुक आहे. त्यांना कुणाकडून काहीच नको. अपेक्षेविना हजार वर्ष आमंत्रणाशिवाय नियमीत येणारे हे वारकरी, हे पण जगातील आश्चर्यच.
आज या भाग्यवंतासाठी सोनियाचा दिवस. पवित्र पंढरी तीर्थस्थानाला पाय लागलेत. चंद्रभागा दिसली. लाडक्या दैवताचे.. विठुरायाचे.. मंदिराच्या कळसाचे दर्शन होणार.
वारकऱ्यांवर हे भारतीय संस्कृतीचे धर्म संस्कार संतांनी केलेत. नित्य नाम घेत देवपूजा.. हरिपाठ.. एकादशी उपवास आणि वारी ही यांची जीवनशैली. वारकऱ्यांची ही निरपेक्षता.. विठ्ठलावरील अढळ श्रद्धा.. हा समता भाव म्हणजे संतांनी उभारलेल्या इमारतीचे फलित, असे संत बहिणाबाईं मानतात.
देवगाव.. रंगारी (ता. कन्नड) येथे जन्मलेल्या या संत तुकोबांच्या शिष्या (१६२८-१७००). वारकरी पंथातील महत्त्वाच्या स्त्री संत. त्यांचे जीवनच तुकामय. वयाच्या ५ व्या वर्षीपासून परमार्थाकडे ओढा.

पूढे कीर्तनातील तुकोबारायांचे अभंग ऐकून त्या एवढ्या प्रभावीत झाल्या की वैकुंठवासी तुकोबांचाच अनुग्रह घेण्याचा निर्धार केला. तुकोबांना गुरु मानून भक्ती सुरू ठेवली. अखेर वैकुंठगमनानंतर तुकोबांनी दर्शन देत अनुग्रह दिला. अनुग्रहानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात अभंग रचलेत.
पृथ्वीवरील पवित्र ठिकाण.. संतांचेही माहेर अशा पंढरीच्या अंगणी भगव्या पताकांचेच राज्य.. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष. सर्वत्र आनंदी आनंद.
सर्वच संत मंडळींच्या पालखी बघून वारकरी आनंदाने त्या त्या पालखीचा इतिहास उत्साहानं एकमेकांना सांगत आहेत. ते बघा, शेगावचे संत गजानन महाराजही आलेत. ती रुख्मिणी मातेची पालखी. त्यांच्या माहेरुन अर्थात अमरावती जवळच्या कौडिंण्यपूरहून आलीय. ४० मुक्काम होतात या पालखीचे.
विठ्ठल दर्शनाचा दिवस म्हणजे हे सुखाचे आगरच आज सापडलेय. तर तुकोबा म्हणतात “आनंदाचे डोही आनंद तरंग”. देव म्हणजे अंतकरणात जागृत होणारा पवित्र भाव. देव या संकल्पनतेवर अतूट विश्वास असणे ही पुर्वजन्माची पुण्याई, असे माऊलींना वाटते.
वारकऱ्यांच्या नयनी आज आनंदाश्रू आहे. आजचा हा वैभवी सोहळा ही वैष्णवांची दिवाळीच.. अवघे पंढरपूर गर्जत आहे विठुनामाचा गजर.
*अजि सोनियाचा दिनु ।*
*वर्षे अमृताचा घनु ॥१॥*
*हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।*
*सबाह्याभ्यंतरी*
*अवघा व्यापक मुरारी ॥२॥*
*दृढ विटे मन मुळी ।*
*विराजित वनमाळी ॥३॥*
*बरवा संतसमागमु ।*
*प्रगटला आत्मारामु ॥४॥*
*कृपासिंधु करुणाकरू ।*
*बाप रखमादेविवरू ॥५॥*
*रचना : संत ज्ञानेश्वर महाराज*
2️⃣
*अवघे गर्जे पंढरपूर*
*चालला नामाचा गजर*
*टाळघोष कानी येती*
*ध्यानी विठ्ठलाची मूर्ती*
*पांडुरंगी नाहले हो*
*चंद्रभागा नीर*
*इडापिडा टळुनि जाती*
*देहाला या लाभे मुक्ती*
*नामरंगी रंगले हो*
*संतांचे माहेर*
*देव दिसे ठाई ठाई*
*भक्त लीन भक्तापाई*
*सुखालागी आला या हो*
*आनंदाचा पूर*
*॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ॥*
*॥ श्री ज्ञानदेव तुकाराम ॥*
*॥ पंढरीनाथ महाराज की जय ॥*


