गडचिरोली नगर परिषदेच्या शाळांमधील कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेवर नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी केलेले आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसून पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारे आणि वैयक्तिक नाराजीतून प्रेरित असल्याचे स्पष्ट करत नगर परिषदेचे शिक्षण सभापती हर्षल गेडाम यांनी या आरोपांचे ठामपणे खंडन केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, कोणत्याही प्रकारचा पक्षपात किंवा दबाव न स्वीकारता संपूर्ण भरती प्रक्रिया नियमानुसार, पारदर्शक व गुणवत्ता आधारित पद्धतीने राबविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.हर्षल गेडाम यांनी सांगितले की, नगर परिषदेच्या विविध शाळांमधून शिक्षकांची कमतरता असल्याबाबत लेखी मागणी प्राप्त झाली होती. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच रिक्त पदांमुळे अध्यापन कार्यावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने तातडीने कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या भरतीसाठी डी.एड. व बी.एड. पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या प्रक्रियेत सुमारे ९० ते १०० अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर नगर परिषद शिक्षण सभापती, शिक्षण अधिकारी आणि संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
मुलाखतीदरम्यान प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, गुण, अध्यापनाचा अनुभव, गुणवत्ता, कौशल्य आणि मेरिट यांचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. संबंधित मुख्याध्यापकांच्या शिफारशीनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आणि त्यातून १८ उमेदवारांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शिक्षण सभापती हर्षल गेडाम यांनी स्पष्ट केले की, ही भरती कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा मनमानी पद्धतीने करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि शाळांमधील अध्यापन नियमित सुरू राहणे हा एकमेव उद्देश या प्रक्रियेमागे होता. त्यामुळे पात्र व गुणवंत उमेदवारांची निवड करून त्यांना तातडीने सेवेत रुजू करून घेण्यात आले.
नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना गेडाम म्हणाले की, वस्तुस्थितीची पडताळणी न करता केलेले आरोप हे केवळ संभ्रम निर्माण करणारे आहेत. अशा विधानांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये अनावश्यक गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे कोणतेही आरोप करण्यापूर्वी संबंधित प्रक्रियेची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांनी असा आरोप केला की, हे आरोप केवळ राजकीय हेतू आणि वैयक्तिक नाराजीपोटी करण्यात आले असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
मुख्याधिकाऱ्यांकडूनही आरोपांचे खंडन
दरम्यान, या प्रकरणावर गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनीही भूमिका स्पष्ट करत सांगितले की, सदर शिक्षक भरती प्रक्रिया ही पूर्णतः कंत्राटी स्वरूपातील असून ती नियमानुसार राबविण्यात आली आहे. नगर परिषदेमार्फत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून मुलाखतीचा संपूर्ण तपशील तसेच निवड झालेल्या उमेदवारांची शिफारस यशश्री एंटरप्रायझेस, सोलापूर यांना अधिकृत पत्राद्वारे पाठविण्यात आली आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया प्रशासकीय नियम आणि कार्यपद्धतीनुसार पार पडली असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, पक्षपात किंवा अनियमितता झालेली नाही. त्यामुळे या भरतीबाबत करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन आणि निराधार आहेत.शिक्षण सभापती हर्षल गेडाम यांनी शेवटी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, नगर परिषदेचे मुख्य ध्येय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि शाळांमधील अध्यापन सुरळीत ठेवणे हेच आहे. याच उद्देशाने गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या तत्त्वावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, भरती प्रक्रियेबाबत करण्यात आलेले सर्व आरोप वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केले.


