गडचिरोली टाइम्स दि. १४जुलै :जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेचे राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणीकरण यशस्वी*ISO/IEC 17025:2017 अंतर्गत अंतिम पुनर्मूल्यांकन पूर्ण; पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या विश्वासार्ह तपासणीला मिळणार अधिक बळ..जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी आंतरराष्ट्रीय दर्जानुसार व अधिक विश्वासार्ह पद्धतीने करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गडचिरोली यांच्या राष्ट्रीय अधिस्विकृती प्रमाणीकरण (NABL – National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories) अंतर्गत ISO/IEC 17025:2017 या आंतरराष्ट्रीय मानकानुसार अंतिम प्रत्यक्ष पुनर्मूल्यांकन (On-site Final Assessment) प्रक्रिया दि. ४ व ५ जुलै २०२६ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली.या मूल्यांकनासाठी एनएबीएलतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञ पथकात प्रमुख मूल्यांकनकर्ता (Lead Assessor) म्हणून मध्यप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ, भोपाळ येथील डॉ. पी. के. श्रीवास्तव तसेच तांत्रिक मूल्यांकनकर्ता (Technical Assessor) म्हणून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मंडळ, खापरखेडा येथील डॉ. रितेश सिंह यांनी प्रयोगशाळेच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, तांत्रिक क्षमता, चाचणी प्रक्रिया, नोंदवही व्यवस्थापन आणि प्रयोगशाळेतील विविध बाबींचे सखोल परीक्षण केले.जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व संनियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गडचिरोली यांच्या अधिपत्याखाली कोटगल रोड, नवीन आरटीओ कार्यालयाजवळ कार्यरत असलेली जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा १४ जुलै २०२१ पासून एनएबीएल मान्यताप्राप्त आहे.या प्रयोगशाळेत जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रांतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील पाणी नमुन्यांची रासायनिक व अनुजैविक घटकांसाठी अभियानांतर्गत मोफत तपासणी करण्यात येते. तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार नागरिकांच्या खासगी पाणी स्रोतांतील नमुन्यांची तपासणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेत वरिष्ठ भूवैज्ञानिक महेंद्र गवळी, सहाय्यक भूवैज्ञानिक तुकेश सयाम, सहाय्यक भूवैज्ञानिक तथा गुणवत्ता व्यवस्थापक पी. बी. मेश्राम, तांत्रिक व्यवस्थापक तथा रसायनी मेघा जयपूरकर, अनुजैविक तज्ज्ञ धनंजय कुमरे, प्रयोगशाळा सहाय्यक श्वेता रामटेके तसेच प्रयोगशाळा मदतनिस अमोल मडावी यांनी उत्कृष्ट समन्वय, तांत्रिक कौशल्य आणि गुणवत्ता व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण करून मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
मूल्यांकनानंतर एनएबीएलच्या तज्ज्ञ पथकाने प्रयोगशाळेतील गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, चाचणी प्रक्रियेची अचूकता, नोंद व्यवस्थापन आणि संपूर्ण टीमच्या कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले. याचबरोबर भविष्यात गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी काही तांत्रिक सूचना व मार्गदर्शनही करण्यात आले.या यशस्वी पुनर्मूल्यांकनामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक, अचूक आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यास बळकटी मिळणार असून, जल जीवन मिशनअंतर्गत सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाला मोठी मदत होणार असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम.एस.गवळी यांनी कळविले आहे.


