गडचिरोली टाइम्स दि. २२ ऑगस्ट २०२६ : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाला आता आणखी मोठे वळण मिळाले आहे. गडचिरोली न्यायालयाने आश्रमशाळेचे संचालक तथा माजी खासदार मारोतराव कोवासे आणि त्यांचे सुपुत्र, संस्थेचे सचिव व गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप आणि प्रशासनावर वाढलेला दबाव यामुळे जपतलाई आश्रमशाळेच्या कारभाराची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. 


