Monday, May 11, 2026
Google search engine
Homeगडचिरोलीमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात ६४७ उद्योग प्रकरणांना मंजुरी, १३५८ बेरोजगारांना रोजगार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात ६४७ उद्योग प्रकरणांना मंजुरी, १३५८ बेरोजगारांना रोजगार

१०७ टक्के उद्दिष्टपूर्ती; सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्क्यांहून अधिक कामगिरी, राज्यात आठवा क्रमांक

गडचिरोली, (जिमाका) दि. २ : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सन २०२५-२६ मध्ये जिल्हा उद्योग केंद्राने प्रभावी अंमलबजावणी करून निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक कामगिरी नोंदवली असून, जिल्ह्याने १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यास ६०० उद्योग प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६४७ उद्योग प्रकरणांना मंजुरी देण्यात येऊन एकूण १३५८ बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही कामगिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात असून, सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्टपूर्ती करत राज्यात आठवा क्रमांक पटकावण्यात आला आहे.

या यशामागे मा. जिल्हाधिकारी तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे सक्षम व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ कर्ज वितरण न करता युवकांना सक्षम उद्योजक बनविण्यावर भर देण्यात आला आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

या यशामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), उमेद अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी, अग्रणी बँक व्यवस्थापन तसेच विविध बँकांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत सर्वाधिक ३२१ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (GDCC) मार्फत ११७, बँक ऑफ इंडिया मार्फत ६१, बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत ५६, एयू स्मॉल फायनान्स बँक मार्फत ४१, तसेच आयडीबीआय बँक मार्फत २५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे.

याशिवाय खादी व ग्रामोद्योग विभाग, एमसीईडी (MCED) व मिटकॉन (MITCON) संस्थांचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण, मार्गदर्शन व समन्वयातून महत्त्वपूर्ण योगदान दिले. जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही समर्पितपणे कार्य करत योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली.

सर्व संबंधित विभाग, बँका व संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश साध्य झाले असून, यामुळे जिल्ह्यातील रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य यांनी कळविले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular