
गडचिरोली परिसरातील श्रद्धास्थान आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध सुफी संत हजरत जिलानी सरकार (जिलानी बाबा) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर गडचिरोलीसह संपूर्ण विदर्भ आणि सीमावर्ती भागातील त्यांच्या अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे. 
हजरत जिलानी सरकार हे हिंदू-मुस्लिम समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान होते. मूळ नाव हबीब मोहसीन, जन्म हैदराबादजवळ झाला होता. ते गडचिरोली येथे राहत होते आणि त्यांची खानकाह (सुफी आश्रम) गडचिरोलीमधील कादरी चौक, दरगाह-ए-कादरी चमन येथे आहे. जंगलात काही काळ तपश्चर्या केल्यानंतर ते १९९६ च्या सुमारास गडचिरोलीत स्थायिक झाले. ते सर्वधर्मभावासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ओळखले जात होते. दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस व उर्स मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यामध्ये कव्वाली आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
गडचिरोली येथील त्यांची खानकाह ही संकटात सापडलेल्या तसेच विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी आशेचे आणि आधाराचे ठिकाण म्हणून ओळखली जात होती. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी विविध समाजातील भाविक येथे येत असत. हजरत जिलानी सरकार यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सय्यद हबीब हुसेन (हुसेन बाबा) तसेच मोठा भक्तपरिवार आहे. त्यांच्या निधनामुळे आध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनुयायांकडून व्यक्त होत आहे. हजरत जिलानी सरकार यांच्या निधनाने गडचिरोलीतील सर्वधर्मसमभावाच्या परंपरेला मोठा धक्का बसला असून, त्यांच्या भक्तपरिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.


