
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’; शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत*
*वनपट्टे, कृषी योजना, घरकुल, कर्जमाफी, आरोग्यासह विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांशी थेट संवाद*
*गणेश मंडळांच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम; गडचिरोलीतील पंचवटी नगरमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद*
दुर्गमता आणि पूर्वीच्या नक्षलवादी परिस्थितीमुळे शासनाच्या विविध योजना, सेवा आणि त्यांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागलेल्या भामरागडमध्ये आता प्रशासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत आज भामरागड येथील वीर बाबुराव शेडमाके गणेश मंडळात विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरिक यांचा थेट संवाद घडवून आणण्यात आला.



वनपट्ट्यापासून घरकुलापर्यंत आणि कृषी योजनांपासून आरोग्य सुविधांपर्यंत नागरिकांनी आपल्या प्रश्नांवर थेट संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दुर्गम भागातील नागरिकांना विविध कार्यालयांत जाऊन माहिती घेण्याऐवजी एकाच व्यासपीठावर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी या उपक्रमामुळे उपलब्ध झाली.
भामरागडसारख्या दुर्गम भागात शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांची अचूक माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रियेची माहिती मिळणे आणि नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांची प्रशासनाने थेट दखल घेणे महत्त्वाचे आहे. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून गणेशोत्सवातील लोकसहभागाचा उपयोग याच उद्देशासाठी करण्यात येत आहे.
*नागरिकांनी मांडले विविध प्रश्न*
भामरागड येथील कार्यक्रमात नागरिकांनी वनपट्टे, कृषी विभागाच्या योजना, क्रीडांगण, वाचनालय, संजय गांधी निराधार योजना, माती परीक्षण, शेतकरी कर्जमाफी, घरकुल, सिटी सर्व्हे, प्रॉपर्टी कार्ड, आरोग्य सुविधा, नाली बांधकाम आदी विविध विषयांवर प्रश्न विचारले.
संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक विषयाबाबत नागरिकांना उपलब्ध योजना, पात्रतेचे निकष, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रश्नांबाबत संबंधित विभागाकडून थेट आणि अधिकृत माहिती मिळाली.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, तहसीलदार किशोर बागडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सोनवणे, गटविकास अधिकारी अतुल इंगळे, गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील, तालुका कृषी अधिकारी कुणाल राऊत यांच्यासह विविध तालुकास्तरीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*सेवा संकल्प अभियानातील विजेत्यांचा गौरव*
याच कार्यक्रमात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विविध शासकीय उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
*पंचवटी नगरमध्येही नागरिक-अधिकारी संवाद*
यापूर्वी दि. १६ सप्टेंबर रोजी गडचिरोली शहरातील आयटीआय चौक, पंचवटी नगर येथील ‘राजा पंचवटीचा’ शिव गणेश मंडळात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसीलदार सागर कांबळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे श्री. मडावी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी आनंद कांबळे, आरोग्य विभागाचे प्रसिद्धी अधिकारी शंतनू पाटील, तसेच गणेश मंडळाचे संस्थापक तथा नगरसेवक लीलाधर भरडकर, गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आश्रम आणि मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी महसूल, आरोग्य, कृषी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासह विविध शासकीय योजना व सेवांची माहिती नागरिकांना देण्यात आली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे देऊन आवश्यक मार्गदर्शन केले.
*गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरून शासन थेट जनतेत*
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातील व्यापक लोकसहभागाचा उपयोग शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, सहकार, पणन, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण यांसह विविध विभागांचा सहभाग आहे. शेतकरी सन्मान निधी, पीक विमा, कृषी औजारांसाठी अनुदान, माती परीक्षण, महिला बचत गट, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महाडीबीटी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आदी विविध योजना व सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
*दुर्गम भागात ‘लोकसंवाद’ला विशेष महत्त्व*
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडसारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात विखुरलेली गावे, दळणवळणाच्या मर्यादा आणि पूर्वीच्या नक्षलवादी परिस्थितीमुळे नागरिक व प्रशासन यांच्यात प्रत्यक्ष संवाद साधताना अनेक अडचणी येत होत्या. बदलत्या परिस्थितीत प्रशासनाची पोहोच दुर्गम भागापर्यंत वाढविण्याबरोबरच शासनाच्या योजना आणि सेवांची अधिकृत माहिती नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
गणेश मंडळासारख्या लोकसहभागाच्या व्यासपीठावर महसूल, कृषी, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर विभागांचे अधिकारी एकत्र येऊन नागरिकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देत असल्याने ‘लोकसंवाद-२०२६’ हा केवळ योजनांच्या प्रसिद्धीचा उपक्रम न राहता दुर्गम भागातील नागरिक आणि प्रशासन यांच्यातील थेट संवादाचा दुवा ठरत आहे.
जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


